पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार असणाऱ्या वाराणसी मतदारसंघामधील महात्मा गांधी काशी विद्यापीठामधील विद्यार्थी निवडणुकांमध्ये भाजपाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (एबीव्हीपी) मोठा फटका बसला आहे. विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकींमध्ये एबीव्हीपीचा पुन्हा एकदा दारुण पराभव झाला आहे. यावेळेस एबीव्हीपीचा सुपडा साफ झालाय. भाजपाची विद्यार्थी संघटना चारही महत्वाच्या जागांसाठी झालेली निवडणूक हारली आहे. या पराभवानंतर एबीव्हीपीने आत्मरिक्षण तसेच पराभव कसा झाला यासंदर्भातील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केलीय. या निवडणुकींमध्ये समाजवादी पक्षाची विद्यार्थी संघटना समाजवादी छात्र सभाच्या विमलेश यादव याने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने दोन जागांवर विजय मिळवलाय.

एनएसयूआयकडून उपाध्यक्षपदी संदीप पाल आणि महामंत्री पदाच्या जागेवर प्रफुल्ल पांडेय यांनी विजय मिळवला आहे. तर पुस्तकालय मंत्री म्हणून अपक्ष उमेदवार असणाऱ्या आशीष गोस्वामीचा विजय झालाय. गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदानाला सुरुवात झाली. पाच तास चालेलं हे मतदान दुपारी दोन वाजता संपलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मतदान करावं म्हणून दोन्हीकडील कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसले. दुपारी दोन वाजेपर्यंत ४७.३८ टक्के मतदान झालं. या निवडणुकीमध्ये एकूण चार हजार २९४ विद्यार्थ्यांनी मतदान केलं. यामध्ये दोन हजार ८६६ विद्यार्थी आणि एक हजार ४२८ विद्यार्थीनींचा समावेश होता. एकूण मतदारांची संख्या नऊ हजार ६२ इतकी आहे.

एकूण २३ केंद्रांवर हे मतदान घेण्यात आलं. ओळखपत्र पाहूनच मतदान करण्यास परवानगी दिली जात होती. सन २०१९ मध्ये वाराणसीमधील महात्मा गांधी काशी विद्यापीठामधील विद्यार्थी निवडणुकांमध्ये अध्यक्षपदावर समाजवादी छात्र सभेच्या संदीप यादव याने विजय मिळवलेला. त्यावेळेसी उपाध्यक्ष पदाची निवडणूक एबीव्हीपीने जिंकली होती. अध्यक्षानंतर सर्वात महत्वाचे म्हणजेच महामंत्रीपद काँग्रेसच्या एनएसयूआयने जिंकलं होतं. मोदींच्या मतदारसंघामध्येच विद्यार्थी संघटनेला अपयश हे तरुणांमध्ये पक्षाचा प्रभाव कमी पडतोय का असा प्रश्न उपस्थित करायला लावणारं आहे अशी चर्चा रंगू लागली आहे.