भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेने दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटना निवडणुका जिंकल्या असून सर्व चारही जागा लागोपाठ दुसऱ्या वर्षी राखल्या आहेत. काँग्रेस समर्थित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया म्हणजे एनएसयूआय या संघटनेचा अभाविपने पराभव केला तर आपची सीवायएसएस ही संघटना तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव, सहसचिव या सर्व जागा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचा पराभव करून जिंकल्या आहेत. अटीतटीच्या लढतीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना ४५०० मते जास्त मिळाली आहेत. छात्र युवा संघर्ष समिती (सीवायएसएस) या आपच्या संघटनेने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली असून त्यांना खाते उघडता आले नाही. त्यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. अभाविपने महत्त्वाच्या चार जागा गेल्याही वर्षी जिंकल्या होत्या.