रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. प्रवाशांना लवकरच उच्च दर्जाचे, मऊ आणि स्वच्छ ब्लॅंकेट पुरवले जाणार आहेत, रेल्वे बोर्डाकडून याबाबत माहिती देण्यात आली. महिन्याच्या सुरूवातीला याबाबतचे निर्देश देण्यात आले असून प्रवाशांना पुरवण्यात येणारे ब्लॅंकेट स्वच्छ असायला हवेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

सध्या रेल्वेमध्ये पुरवण्यात येणारे ब्लॅंकेट लोकरीपासून तयार केलेले असतात, त्यामुळे ते जास्त वजनदार असतात. परिणामी या ब्लॅंकेटची साफसफाई करताना अडचणी येतात, उशीराने धुतले जातात. पण आता जे नव्याने ब्लॅंकेट पुरवण्यात येणार आहेत त्यांचं वजन 450 ग्राम असेल. या ब्लॅंकेटमध्ये 60 टक्के लोकर आणि 15 टक्के नायलॉनचा वापर करण्यात आला आहे.

नवे ब्लॅंकेट महिन्यातून दोन वेळेस धुवायला हवेत असं रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं आहे. दोन वेळेस धुण्यामध्ये काही अडचणी असतील तर महिन्यातून किमान एकदा तरी हे ब्लॅंकेट धुतले गेलेच पाहिजेत असं बोर्डाने सांगितलं आहे. सध्याचे ब्लॅंकेट महिन्यातून एकदा ड्राय क्लिनींग करून वापरले जातात.