08 March 2021

News Flash

भारतीय सैनिकांना लवकरच मिळणार ए.सी. जॅकेट्स?

सरकारतर्फे एसी जॅकेट्सची चाचणी सुरू करण्यात आली आहे

संग्रहित छायाचित्र

भारतीय सैन्यदलातील ‘विशेष सैनिक दला’च्या जवानांना लवकरच ए.सी. अर्थात वातानुकूलित जॅकेट्स दिली जाण्याची शक्यता आहे,  या जॅकेट्सची चाचणी सध्या केंद्र सरकारतर्फे करण्यात येते आहे. यानंतर मंजुरी मिळाल्यास ही जॅकेट्स विशेष सैनिक दलाच्या (स्पेशल फोर्स) जवानांना देण्यात येतील, माहिती माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे.

विशेष सैनिक दलातील जवानांना अनेकदा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत त्यांना अनंत अडचणी येतात.  अशावेळी जवान अस्वस्थ होतात, त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असंही पर्रिकर यांनी स्पष्ट केलं आहे. शनिवारी पणजीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मनोहर पर्रिकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

तेजस विमानांबाबतही भाष्य

याच कार्यक्रमात मनोहर पर्रिकर यांनी तेजस या लढाऊ विमानाबाबतही भाष्य केलं. तेजस हे विमान हलक्या लढाऊ विमानांच्या ( लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट ) श्रेणीत मोडतं, या विमानात अवघे ३.५ टन वजन वाहून नेण्याचीच क्षमता आहे आणि या विमानांच्या बाबतीत हाच एक कमकुवत मुद्दा आहे असंही पर्रिकर यांनी स्पष्ट केलं आहे.

२०१४ ते २०१७ या काळात मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षण मंत्री होते त्यानंतर २०१७ च्या सुरूवातीलाच ते गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान झाले. जागतिक स्तरावर होणाऱ्या युद्धांचा सामना करण्यासाठी भारत सुसज्ज शस्त्रास्त्रे आणि उपकरणं तयार करतो आहे. एसी जॅकेट्स हे त्याच संदर्भातील एक पाऊल आहे असंही पर्रिकर यांनी म्हटलं आहे.

तेजस विमानासंदर्भातली चर्चा पाच ते सहा वर्षांपूर्वीच झाली होती, मात्र त्यावर यूपीए सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. संरक्षण मंत्री झाल्यावर मी हे विमान भारताच्या ताफ्यात यावं यासाठी वायुदलासोबत १८ बैठका केल्या असल्याचंही पर्रिकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

तेजस हे स्वदेशी बनावटीने तयार करण्यात आलेलं लढाऊ विमान आहे याचा अभिमान आहे असंही पर्रिकर यांनी म्हटलं आहे. फक्त ३.५ टन वजनाची स्फोटकं किंवा बॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता एवढा एक मुद्दा सोडला तर तेजस या लढाऊ विमानात असे अनेक गुण आहेत जे इतर लढाऊ विमानांमध्ये नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच विशेष सैनिक दलाच्या जवानांना एसी जॅकेट्स कशी देता येतील? त्यांचा त्रास कसा कमी करता येईल यावरही विचारविनिमय सुरू असल्याचंही पर्रिकर यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 4:57 pm

Web Title: ac jackets for indian special forces soon says manohar parrikar
टॅग : Manohar Parrikar
Next Stories
1 पाच वर्षात २९८ भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व
2 जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये घट; एनआयएच्या कारवायांमुळे लगाम : राजनाथ सिंह
3 भारतात गोरखपूरसारखी घटना लाजिरवाणीच; जेटलींचा योगी सरकारला ‘घरचा आहेर’
Just Now!
X