आंध्रप्रदेशात एका शिपायाच्या घरात करोडोंची संपत्ती सापडली आहे. लाचलुपच प्रतिबंधक विभागाने छापा टाकला असता १०० कोटीहून अधिक संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले होते. एका शिपायाच्या घरात इतकी संपत्ती सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नरसिम्हा रेड्डी असं या शिपायाचं नाव आहे. नेल्लोर येथे उपप्रादेशिक परिवहन विभागात तो शिपाई म्हणून काम करतो. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नरसिम्हा रेड्डी याच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली.

छापेमारीदरम्यान हिरे आणि दागिन्यांसोबत करोडोंच्या किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. एसीबीने एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली. जिथे दोन किलो सोनं, सात किलो चांदी आणि ७.७० लाख रोख रुपये, पन्नास एकरहून जास्त जमीन आणि १७ बंगल्यांशिवाय पेंटहाऊस असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नरसिम्हा रेड्डीचा पगार महिना चाळीस हजार रुपये आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडल्याने अधिकारीही संभ्रमात पडले आहेत. कागदपत्रांवरुन अधिकाऱ्यांना माहिती मिळाली आहे की, आरोपीने एक कोटींचा जीवन विमा, १० आणि २० लाखांची एलआयसी पॉलिसीदेखील घेतलेली आहे. नरसिम्हा रेड्डी २२ ऑक्टोबर १९८४ पासून शिपायाचं काम करत आहेत. गेल्या ३४ वर्षांपासून कोणतंही प्रमोशन न घेता तो शिपाई म्हणून काम करत आहे. शिपाई म्हणून पैसे कमवायला मिळत असल्याने त्याने प्रमोशन घेतलंच नाही असं एसीबीने सांगितलं आहे.