अमेरिकेत लॉसएंजल्स येथे स्थापन करण्यात आलेल्या परदेशातील पहिल्या जागतिक योग विद्यापीठात यावर्षी  एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून भारताने योगप्रसारात मोठी भूमिका पार पाडण्याचे ठरवले आहे.  २१ जून हा दरवर्षी जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. विवेकानंद योग विद्यापीठ एकूण ५०लाख डॉलर्स खर्चून उभारण्यात आले असून केस वेस्टर्न विद्यापीठाचे प्राध्यापक श्रीनाथ व भारतीय योग गुरू एच. आर. नागेंद्र यांना या विद्यापीठाची सूत्रे देण्यात आली आहेत. एप्रिलपासून प्रवेश सुरू होत असून ऑगस्ट २०२० पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील. यात योगातील उच्चशिक्षणाचा समावेश असून या विद्यापीठाला कॅलिफोर्नियातील खासगी शिक्षण मंडळाने नोव्हेंबर २०१९ मध्ये मंजुरी दिली आहे.