आपल्या देशातले सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. भारताचे माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांचे ते भाऊ होते. कला क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने १९९९ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. याचसोबत सतीश गुजराल यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कार चित्रकलेतील योगदानासाठी आणि एक राष्ट्रीय पुरस्कार शिल्पकलेतील योगदानासाठी देण्यात आला आहे. सतीश गुजराल यांचा जन्म २५ डिसेंबर १९२५ रोजी झाला होता. त्यांनी लाहोर येथील मेयो स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकला आणि ग्राफिक डिझाईन याचं प्रशिक्षण घेतलं होतं.

१९४४ मध्ये ते मुंबईत निघून आले. त्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलेचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली मात्र १९४७ मध्ये ते आजारी झाले. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. आपल्या वेगळ्या शैलीच्या चित्रकलेसाठी ते ओळखले जातात. त्यांची चित्रं भावनाप्रधान असतात. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सतीश गुजराल यांचा सन्मान करण्यात आला आहे. मेक्सिकोचा लिओ नार्डो द विन्सी आणि बेल्जियम येथील राजातर्फे गार्ड ऑफ क्राऊन या पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे.

वैविध्यपूर्ण आकृत्यांमधून चित्र उलगडलं जाणं ही त्यांच्या चित्रांची खास शैली होती. पशू, पक्षी हे त्यांच्या चित्रांमधला एक प्रमुख भाग आहेत. इतिहास, लोककथा, पुराण, प्राचीन भारतीय संस्कृती आणि विविध धर्मांमधील प्रसंग त्यांनी आपल्या कॅनव्हासवर आणले. कला क्षेत्रात वेगळी उंची गाठणाऱ्या या कलाकाराने आता कायमयची एक्झिट घेतली आहे.