हरयाणामध्ये एका कॉलेजबाहेर दिवसाढवळ्या एका २० वर्षीय विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने या तरुणीला आधी गाडीमध्ये बसवून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने याला विरोध केल्याने या तरुणाने तिच्यावर गोळीबार केला. या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गोळी झाडणारा आरोपी हा २१ वर्षांचा आहे. आरोपी याच मुलीच्या वर्गात होता. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मरण पावलेल्या तरुणीचे नाव निकिता तोमर असून ती बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तिच्यावर गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव तौसीफ असून, तो गुरगावमधील सोहना येथील कबीर नगरचा रहिवाशी आहे. या हल्ल्यामध्ये तौसीफला मदत करणाऱ्या रेहानलाही अटक करण्यात आली आहे. तौसीफ हा आपल्या मुलीला त्रास देत होता, असा आरोप तोमर कुटुंबियांनी केला आहे. निकिताने आपल्याशी लग्न करावं यासाठी तौसीफ तिच्या मागे लागला होता, असा कुटुंबियांचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार सोमवारी दुपारी चारच्या सुमारास भल्लभगढमधील अग्रवाल महविद्यालयासमोर घडला. याच महाविद्यालयामध्ये निकिता आणि आरोपी शिक्षण घेत होते. परीक्षा झाल्यानंतर निकिता घरी येण्यासाठी निघाली असता दोन तरुणांनी तिचा रस्ता आडवून तिला आय २० कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. तिने यासाठी विरोध केला असता, तिच्यावर गोळीबार करण्यात आला, असं नितिकाच्या भावाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून, निकिताला गनपॉइण्टवर गाडीत बसण्यासाठी दोन्ही तरुण बळजबरी करत असल्याचं दिसत आहे. मात्र पिस्तुल दाखवून गाडीत बसण्यासाठी बळजबरी करत असणाऱ्याच्या हातून स्वत:ची सुटका करुन घेत निकिता आपल्या मैत्रिणीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होती. मात्र मुख्य आरोपीने निकिताच्या मैत्रिणीला बाजूला करत तिच्यावर गोळी चालवली. या व्हिडीओमध्ये दुसरा आरोपीही गाडीखाली उतरुन निकिताला मुख्य आरोपीच्या दिशेने ढकलताना दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर दोघांनाही गाडीमधून पळ काढला. निकिता रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडून होती.

निकिताला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निकिताच्या उजव्या खाद्यांला गोळी लागली होती.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपींनी अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी फरिदाबाद, पलवाल आणि नूह जिल्ह्यांमध्ये पाच तासांमध्ये अनेक पथकांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली. पोलिसांनी मुख्य आरोपीसहीत त्याच्या साथीदाराला सोमवारी रात्री अटक केली. २०१८ साली या तरुणीच्या नातेवाईकांनी मुलीच्या अपहरणासंदर्भातील तक्रार केल्याचे चौकशीमध्ये समोर आलं आहे. मात्र नंतर पालकांनी या प्रकरणामध्ये अधिक चौकशी न करण्याची मागणी करत तक्रार मागे घेतली होती,” असं पोलीस आयुक्त ओ. पी. सिंग यांनी सांगितलं.

मंगळवारी निकिताच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी भल्लभगढ-सोहना मार्गावर धरणे आंदोलन करत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.