दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण : याचिका फेटाळल्या, शिक्षेच्या स्थगितीस नकार

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन दोषींच्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या. या प्रकरणात दोषी ठरलेल्या या दोघांसह चौघांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची २२ जानेवारीला अंमलबजावणी होणार आहे.

विनय शर्मा (२६), मुकेश कुमार (३२), अक्षय कुमार सिंग (३१) आणि पवन गुप्ता (२५) या चौघांना २२ जानेवारी रोजी फाशी देण्याचे वॉरंट दिल्लीतील न्यायालयाने ७ जानेवारी रोजी काढले होते. त्याविरोधात विनय आणि मुकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या दालनात (इन-चेंबर) सुनावणी झाली.

या यचिका आणि इतर कागदपत्रे आम्ही पाहिली असून, याचिका विचारात घेण्याचा कोणताही मुद्दा आढळला नाही. सर्वोच्च न्यायालयाने रूपा अशोक हुरा वि. अशोक हुरा व इतर प्रकरणात दिलेल्या निकालाच्या निकषातही या याचिका बसत नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका फेटाळल्या.  याचिका फेटाळणाऱ्या खंडपीठात न्या. अरुण मिश्रा, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. आर. बानुमथी, न्या. अशोक भूषण यांचा समावेश होता.

विनय आणि मुकेश यांनी ९ जानेवारीला या याचिका दाखल केल्या होत्या. दिल्ली न्यायालयाने फाशीचा आदेश जारी केल्यानंतर अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांनी या याचिका दाखल केलेल्या नाहीत. दिल्लीत १६-१७ डिसेंबर २०१२ च्या मध्यरात्री चालत्या गाडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. अमानुष छळ करून तिला रस्त्यावर फेकून देण्यात आले. २९ डिसेंबर रोजी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील एक आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

बाल गुन्हेगारही या क्रूर कृत्यात सामील होता. पण तीन वर्षे सुधारगृहात राहिल्यानंतर त्याची सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. ‘‘गेल्या सात वर्षांपासूनचा माझा संघर्ष संपणार असल्याचा मला आनंद आहे. आता आरोपींना उपलब्ध असलेले इतरही पर्याय नाकारले जातील, अशी आशा आहे. चार आरोपींना २२ जानेवारीला फाशी होणार असल्याने हा माझ्यासाठी खास दिवस असेल, अशी प्रतिक्रिया पीडित तरुणीच्या आईने दिली.

एका आरोपीचा राष्ट्रपतींकडे अर्ज :  सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताच या प्रकरणातील आरोपी मुकेश याने राष्ट्रपतींकडे धाव घेतली. त्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केल्याचे समजते. दरम्यान, फाशीच्या शिक्षेचा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी मुकेश याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.