पाकिस्तानसहित संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरीडवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला अखेर शिक्षा देण्यात आली आहे. चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपी इमरान अलीला (24) फाशी देण्यात आली आहे. आरोपीला बुधवारी पहाटे 5.30 वाजता लाहोरमधील कोट लखपत जेलमध्ये फासावर लटकवण्यात आलं. पाकिस्तानमधील पंजाबमध्ये सात वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पाकिस्तानसहित संपूर्ण जगभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.

आरोपी इमरान अलीला फाशी देण्यात आली तेव्हा तिथे दंडाधिकारी आदिल सरवार आणि पीडित मुलीचे वडील उपस्थित होते. आरोपी अलीच्याही कुटुंबियांना त्याने केलेल्या गुन्ह्याची मिळत असलेली शिक्षा पाहण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. फाशी देण्याआधी आरोपी अलीला 45 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. ज्यामध्ये त्याने आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली.

मुलीच्या वडिलांनी आरोपीला फाशी देण्यात आल्यानंतर आपण समाधानी असल्याची भावना व्यक्त केली. आज जर माझी मुलगी जिवंत असती तर सात वर्ष दोन महिन्यांची असती हे सांगाताना प्रशासनाने फाशी टीव्हीवर न दाखवल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

घटनेनंतर फक्त नऊ महिन्यात तपास करत प्रकरणाचा निकाल लावण्यात आला होता. आरोपी पीडित मुलीचा शेजारी होता. बलात्कार केल्यानंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. पीडित मुलीचे आई-वडील सौदी अरबमध्ये राहात होते तर ती कसूर येथे नातेवाईकांकडे राहत होती.

पीडित मुलगी 5 जानेवारी 2018 रोजी बेपत्ता झाली होती. यानंतर शाहबाज खान रोडजवळ कचरा कुंडीत तिचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदन केलं असता मुलीवर बलात्कार झाला असल्याचं निष्पन्न झालं होतं. धक्कादायक म्हणजे आरोपी इमरान अलीने चौकशीदरम्यान आपण आतापर्यंत अशाप्रकारे नऊ मुलींना टार्गेट केल्याची कबुली दिली होती.