काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून तेथील मुलांना आताच्या तणावग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढून शाळेत जाण्यासाठी मदत करावी, असे आवाहन नोबेल विजेत्या पाकिस्तानी शिक्षण हक्क कार्यकर्त्यां मलाला युसुफझाई यांनी  केले आहे. त्यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. भारताची आघाडीची नेमबाज हिना सिद्धूनेही मलाला युसुफझाईला खडेबोल सुनावले आहेत. सिद्धूने मलाला हिला पाकिस्तानमध्ये मुलींना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची आठवण करुन दिली आहे. काश्मीरमधील मुलींच्या शिक्षणाची चिंता असणाऱ्या मलालाने पाकिस्तानमधील मुलींच्या शिक्षणाची काळजी करावी असा सल्ला देतानाच शिक्षणाची इच्छा असल्यामुळेच मलालावर जीवघेणा हल्ला झाला ज्यातून तिचा जीव थोडक्यात बचावल्याचा टोलाही सिद्धूने लगावला आहे.

सिद्धूने मलालाचे ट्विट कोट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये सिद्धू म्हणते, ‘तर तुझं असं म्हणणं आहे की काश्मीर पाकिस्तानच्या हाती द्यायला हवे. कारण तेथील शिक्षण व्यवस्था इतकी चांगली आहे की तुझ्यासारख्या मुलीचा जीव जाता जाता राहिला आणि तुला देशातून पळून जावे लागले. तू अद्यापही स्वत:च्या देशात परत आलेली नाहीस. तू स्वत:च्या देशात म्हणजेच पाकिस्तानमध्ये परत का जात नाहीस?’

मलालाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये, ‘संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील नेत्यांनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. काश्मीरमधील लोकांचे म्हणणे ऐकावे. तसेच मुलांना सुरक्षित शाळेत पाठवण्याची व्यवस्था करावी,’ असे म्हटले होते. ‘गेले चाळीस दिवस काश्मीरमधील मुले शाळेत जाऊ शकलेली नाहीत, मुली घराच्या बाहेर पडण्यास घाबरत आहेत. काश्मीरमधील मुलींच्या कहाण्या मला ऐकायच्या आहेत. दूरसंचार यंत्रणेवरच बंदी असल्याने त्यांचे म्हणणे जगासमोर आलेले नाही. त्यांचा आवाज दाबून उपयोगाचे नाही, त्यांचे म्हणणे जगासमोर आले पाहिजे,’ असंही मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. #LetKashmirSpeak हा हॅशटॅगने मलालाने आपल्या ट्विटमध्ये वापरला होता.

मलाला युसुफझाईने काश्मीरमधील तीन मुलींशी माझे बोलणे झाल्याचे म्हटले आहे. या मुली शाळेमध्ये जाऊ शकत नसल्याने त्यांना परिक्षाही देता आली नाही असं मलालाने ट्विट केले आहे. यावरुनच हिना सिद्धूने तिला आठवण करुन दिली की पाकिस्तानमधील शिक्षण व्यवस्था इतकी गंभीर आहे की केवळ शाळेत जाते म्हणून मलालावर २०१२ मध्ये तालिबाननं गोळीबार केला होता. पाकिस्तानमध्ये उपचार सुरु असतानाचा तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर तिला लंडनमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं. उपाचारासाठी ब्रिटनमध्ये गेलेली मलाला मागील वर्षी एका कार्यक्रमासाठी मायदेशी गेली होती. त्यानंतर ती पुन्हा ब्रिटनमध्ये आली आणि तेथेच स्थायिक झाली आहे