अमेरिकेचा पाकिस्तानला सज्जड दम

जर पाकिस्तानने दहशतवादी गटांवर निर्णायक कारवाई केली नाही तर अमेरिका वेगळ्या पद्धतीने डावपेच आखून ते उद्दिष्ट साध्य करील, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी नुकताच भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांचा दौरा केला. पाकिस्तानने दहशतवादी गटांवर कारवाई करून त्यांचे सुरक्षित असलेले अड्डे उद्ध्वस्त करावेत, असे टिलरसन यांनी सांगितल्याची माहिती परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हिथर नोएर्ट यांनी दिली.

आम्ही आमच्या अपेक्षा पाकिस्तानला कळवल्या आहेत. पाकिस्तानने त्यांच्या भूमीतून काम करणाऱ्या दहशतवादी गटांवर कारवाई करावी. दहशतवाद्यांबाबतच्या माहितीचे आदानप्रदान करावे.  पाकिस्तानी नेत्यांशी झालेली चर्चा म्हणजे केवळ भाषणबाजी नव्हती, मतांचे आदानप्रदान झाले. त्यांच्याकडून ८० टक्के ऐकले व वीस टक्के बोललो. कारण पाकिस्तानी नेत्यांशी यापूर्वी कधी चर्चा झाली नव्हती, त्यामुळे जास्त ऐकणे मला योग्य वाटले.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान आपले सार्वभौमत्व गहाण टाकणार नाही व शरणागतीही पत्करणार नाही.

पाकिस्तान हा सार्वभौम देश आहे, पण त्यांनी दहशतवादी अड्डे नष्ट केले पाहिजेत. त्यांनी तसे केले नाही किंवा त्यांना करता येत नसेल तर डावपेच बदलून आम्ही ते करू.

– रेक्स टिलरसन