सरन्यायाधीशांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांपैकी एक असलेले कुरियन जोसेफ यांनी हा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास शनिवारी येथे व्यक्त केला. हा तिढा सोडविण्यासाठी बाह्य़शक्तींच्या मध्यस्थीची गरज नाही, न्याय आणि न्यायपालिकेच्या हितासाठीच केवळ आम्ही ही कृती केल्याचेही त्यांनी येथे स्पष्ट केले.

प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांनी त्याची दखल घेतली आहे, भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, त्यामुळे प्रश्नावर तोडगा निघाला असल्याचा आपल्याला विश्वास आहे, असे न्या. कुरियन म्हणाले.

प्रश्न सोडविण्यासाठी बाह्य़शक्तींची गरज नाही, कारण हा संस्थेतील अंतर्गत प्रश्न आहे आणि तो सोडविण्यासाठी संस्था आवश्यक ती पावले उचलेल, असेही ते म्हणाले.

सदर बाब राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली नाही, कारण सर्वोच्च न्यायालय किंवा तेथील न्यायाधीशांबाबत राष्ट्रपतींची घटनात्मक जबाबदारी नाही, असेही ते म्हणाले.

सरन्यायाधीशांकडून कोणतीही घटनात्मक चूक झालेली नाही, मात्र जबाबदारी पार पाडताना प्रथा आणि प्रचलित पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, आम्ही केवळ हीच बाब सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली, असेही ते म्हणाले.

आपल्या कृतीने शिस्तीचा भंग केल्याच्या आरोपाचे कुरियन जोसेफ यांनी जोरदार खंडन केले, उलटपक्षी आमच्या कृतीमुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रशासनामध्ये अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

न्याय आणि न्यायपालिकेसाठीच आम्ही हे पाऊल उचलले आहे, त्यापलीकडे अन्य कोणतेही कारण नाही, हेच आम्ही दिल्लीत शुक्रवारी स्पष्ट केले, असे जोसेफ यांनी एका स्थानिक मल्याळी दूरचित्रवाणी वाहिनीला सांगितले.

या प्रश्नाकडे आता सर्वाचे लक्ष वेधले गेले असल्याने हा प्रश्न लवकरच निकाली निघेल. जनतेचा न्यायपालिकेवरील विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा यासाठीच केवळ आम्ही हे पाऊल उचलले, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.