काही भारतीयांचा काळा पैसा आपल्या देशातील काही बँकात असल्यासंबंधात फ्रान्स सरकारने गेल्या वर्षी दिलेल्या माहितीबाबत प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे, असा दावा केंद्र सरकारने शनिवारी केला. जीनिव्हातील एचएसबीसी बँकेत भारतीय उद्योजकांचा काळा पैसा असून त्याबाबत फ्रान्सने माहिती देऊनही सरकार थंड आहे, असा आरोप भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात कोणत्याही बँकेचे अथवा व्यक्तिचे नाव नाही. या निवेदनात म्हटले आहे की, ‘जून २०११ मध्ये फ्रान्स सरकारने परदेशी बँकातील भारतीय नागरिकांच्या काळ्या पैशाची माहिती दिली आहे. लोकसभेत १४ डिसेंबरला मांडल्या गेलेल्या स्थगन प्रस्तावावरील चर्चेत तत्कालीन अर्थमंत्र्यांनी यासंबंधात माहिती दिली होती. तसेच राज्यसभेत २३ ऑगस्ट २०१२ रोजी याबाबतच्या प्रश्नोत्तरांतही कारवाईचा तपशील दिला होता. फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीची छाननी झाली असून १९६१ च्या प्राप्तिकर कायद्यानुसार प्रत्येक प्रकरणाचा छडा लावला जाईल.’
फ्रान्सने दिलेली माहिती ही उभय देशांतील दुहेरी करविरोधी करारानुसार गोपनीय असून केवळ करांबाबतच तिचा वापर केला जाणार आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. केजरीवाल यांनी काही उद्योजकांची नावे घेत आरोप केला होता की, जीनिव्हातील एचएसबीसी बँकेत भारतीयांची ७०० खाती असल्याची माहिती फ्रान्सने देऊनही सहा हजार कोटींच्या या काळ्या पैशाबाबत सरकारने त्याबाबत तसूभरही कारवाई केलेली नाही.

मी डेंग्यूचा डास
मी साधासुधा नव्हे तर डेंग्यूचा डास आहे. मी चावा घेतल्यास भाजप, काँग्रेसचे आरोग्य बिघडेल, असा खोचक टोला केजरीवाल यांनी शनिवारी लगावला. सलमान खुर्शीद यांनी केजरीवाल यांचे आरोप हे डासांच्या चाव्याइतके किरकोळ असल्याची टीका केली होती.