अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याची कृती ही आकस्मिक होती. त्यात कुठलाही कटकारस्थानाचा भाग नव्हता, असे सीबीआय न्यायालयाने निकालात म्हटल्याने भाजपच्या भूमिकेस मोठे पाठबळ मिळाले आहे.

राम मंदिर चळवळीच्या जोरावरच भाजपने सत्ता सोपानावरील पायवाट सोपी केली होती. या निकालाचे भाजपने स्वागत केले असून बाबरी मशीद पाडण्याचे कुठलेही कटकारस्थान नव्हते, ती एक प्रतिक्षिप्त किंवा आकस्मिक कृती होती, या भाजप नेत्यांच्या भूमिकेचा विजय झाला आहे.

बिहारमधील निवडणुका तोंडावर असताना भाजपला याचा फायदा होणार आहे. त्याशिवाय लोकसभेची एक आणि विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुका होत असून त्यातही या भावनिक मुद्दय़ाने पुन्हा भाजपला यशाची आशा आहे. सीबीआय न्यायालयाने सर्वच भाजप नेत्यांना दोषमुक्त केल्याने आता भाजप उजळ माथ्याने राजकारण करू शकणार आहे.

भाजपने राम मंदिर चळवळ हाती घेतली. त्यात लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल आघाडीवर होते. त्या चळवळीच्या मदतीने हळूहळू भाजपची सदस्यसंख्या संसदेत नंतर वाढत गेली, पण बाबरी पाडल्याच्या आरोपासून दूर राहण्याचा भाजपचा उद्देश आता सफल झाला आहे.

राम जन्मभूमी चळवळ व अडवाणी यांची रथयात्रा या १९९० मधील घटनांपासून मंदिर उभारणीच्या चळवळीस जोर मिळाला. त्यातून भाजपला जनाधार मिळत गेला. त्या वेळी हिंदुत्ववादी संघटनांनी मोठय़ा प्रमाणावर कारसेवक जमवले व जमावाने मशीद पाडली होती. आजचा निकाल हा सत्य व न्यायाचा विजय असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

..हा रामजन्मभूमी चळवळीचा विजय -अडवाणी

* राममंदिरासाठी रथयात्रा काढणारे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी (वय ९२) यांनी विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाचे ‘जय श्रीराम’च्या घोषणेने स्वागत केले. हा भाजपची मूल्ये व श्रद्धा यांच्यासह आपल्या भूमिकेचा व्यक्तिगत विजय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

* रामजन्मभूमी चळवळ ज्या तत्त्वांवर आधारित होती, त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. १९९२ मध्ये लालकृष्ण अडवाणी हे रामजन्मभूमी चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ व सूत्रधार होते. त्यांना इतर ३१ आरोपींसमवेत दोषमुक्त करण्यात आले.

* चित्रफीत संदेशात त्यांनी म्हटले आहे, की हा अतिशय महत्त्वाचा निकाल असून आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. हा माझा व्यक्तिगत विजय तर आहेच शिवाय भाजपची रामजन्मभूमी चळवळीबाबतची वचनबद्धता व मूल्ये यांचा विजय आहे. त्यामुळे अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहावे हे माझे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचे भूमिपूजनही ५ ऑगस्टला झाले आहे.

ऐतिहासिक निकालाने वाद संपुष्टात यावा -जोशी

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व ३२ आरोपींना दोषमुक्त केल्याचा निकाल ऐतिहासिक असून त्यामुळे या वादाचा आता तरी शेवट होईल अशी आशा असल्याचे मत भाजपचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते तसेच या प्रकरणातील एक आरोपी मुरलीमनोहर जोशी यांनी व्यक्त केले आहे.

बाबरी मशीद पाडण्यात आली, त्या वेळी मुरलीमनोहर जोशी हे भाजपचे अध्यक्ष होते. हजारो कारसेवक अयोध्येत जमले होते व त्यांनी बाबरी मशीद पाडली. जोशी म्हणाले, की आमचे कुठले कटकारस्थान नव्हते, हे आता न्यायालयानेच मान्य केले आहे. आता या निकालाने तरी हा वाद संपुष्टात आला पाहिजे. सगळा देश भव्य राममंदिराची वाट पाहात आहे.