दरवाढ थोपविण्यासाठी केंद्राचे पाऊल
डाळींच्या वाढत्या दरांवर काटेकोर लक्ष ठेवणे आवश्यक असून राज्यांनी डाळींची साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश केंद्र सरकारने बुधवारी दिले. डाळींचे किरकोळ दर हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत. गेल्या वर्षी २०० रुपये किलो असलेले दर आता किलोमागे ८३ ते १७७ रुपयांवर आले आहेत. तरी दुष्काळामुळे डाळींचे देशांतर्गत उत्पादन घटल्याने दर वाढण्याची भीती आहे. त्याचा फायदा घेत साठेबाजांनी डाळींची दरवाढ करू नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले, की, डाळींच्या संदर्भात गेल्या सरकारने काही केले नाही. आता आम्ही डाळींच्या लागवडीस उत्तेजन दिले आहे.
भाव चढाई..
ग्राहक कामकाज मंत्रालयाच्या माहितीनुसार आज उडदाचा भाव किलोला १७७ रुपये, तूर १६३ रु., मूग १२३ रु. किलो, मसूर १०५ रु. किलो, हरभरा ८३ रु. किलो असा होता. गेल्या महिन्यातील किरकोळ भाव उडीद १७२ रु. किलो, तूर १६० रु. किलो, मूग १२२ रु. किलो, मसूर ९८ रु. किलो तर हरभरा ७४ रु. किलो असे होते.

उत्पादनातही वाढ
कृषी मंत्रालयाच्या सुधारित अंदाजानुसार २०१५-१६ या वर्षांत डाळींचे उत्पादन गेल्या वर्षीच्या १७.१५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त म्हणजे १७.३३ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. भारत हा डाळींचा सर्वात मोठा उत्पादक देश असला तरी डाळीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने डाळ आयात करावी लागते.