दक्षिण दिल्लीतील संत रवीदास कॅम्प भागात बीबीसीचा ‘इंडियाज डॉटर’ हा वृत्तपट प्रदर्शित केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल सादर केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे पोलीस प्रवक्ते राजन भगत यांनी सांगितले की, प्राथमिक माहिती अहवालात कुणाचे नाव घेण्यात आलेले नाही, परंतु हा माहितीपट दाखवल्याच्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चित्रपटनिर्माते केतन दीक्षित यांनी काल असा आरोप केला होता की, संत रवीदास कॅम्प येथे हा वृत्तपट दाखवण्यात आला. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता.
त्या घटनेवर आधारित असलेला हा वृत्तपट बीबीसीसाठी चित्रपट निर्मात्या लेस्ली लुडविन यांनी तयार केला होता व त्यानंतर न्यायालयाने हा वृत्तपट प्रदर्शित करण्यास केंद्र सरकारच्या आदेशानंतर स्थगिती दिली होती. या वृत्तपटावर बंदी घालण्याचा अधिकार सरकारला आहे असा निकाल काल एका न्यायालयाने दिला आहे.