बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांनी विदर्भातील ३५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील १३९८ शेतकऱ्यांचे ४.०५ कोटी रुपयांचे कर्ज अदा केले आहे. आपल्या ब्लॉगवर याची माहिती देताना बच्चन यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व शेतकऱ्यांना मुंबईला आणणे शक्य नाही. त्यासाठी ७० शेतकऱ्यांना मुंबईला आणण्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी रेल्वेची एक बोगी बुक केली आहे. २६ नोव्हेंबरला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.

ते लिहितात, उत्तर प्रदेशमधील ज्या १३९८ शेतकऱ्यांचे बँक कर्ज फेडण्याचा विचार केला होता. तो पूर्ण केला आहे. बँकांनी त्यांच्या नावाने ओटीएस प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा मला खूप आनंद झाला आहे. या शेतकऱ्यांना स्वहस्ते ओटीएस प्रमाणपत्र देण्याची माझी इच्छा आहे. पण इतक्या शेतकऱ्यांना मुंबईत बोलवणे शक्य नाही. त्यामुळे त्यातील ७० शेतकऱ्यांना निवडले आणि त्यांच्यासाठी एक बोगी बुक करुन त्यांना लखनऊहून मुंबईला बोलावले जाणार आहे.

शेतकरी सातत्याने संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे त्यांचे ओझे कमी करण्याची माझी इच्छा होती. सर्वांत आधी महाराष्ट्रातील ३५० हून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यात आले. आता उत्तर प्रदेशमधील १३९८ शेतकऱ्यांचे थकीत ४.०५ कोटींचे कर्ज फेडले आहे. या कार्यामुळे आंतरिक शांतता लाभते.

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी एका सरकारी संस्थेद्वारे देशाच्या सुरक्षेसाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या ४४ कुटुंबीयांना आर्थिक मदत केली होती. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले की, मी महाराष्ट्राकडून शहीदांच्या ४४ कुटुंबीयांना ज्यामध्ये ११२ लोकांना छोटीशी मदत केली. या शहीदांच्या मदतीसाठी देशातील इतर भागातूनही मदत येणे आवश्यक आहे.