प्रेक्षकशरण चित्रपटांनी व्यापलेल्या रूपेरी पडद्यावर देशस्वातंत्र्यासाठी जनसामान्यांना चेतवणाऱ्या संन्यस्त महात्म्याची भव्य वास्तवकथा साकारणारे दिग्दर्शक, निर्माते, लेखक व अभिनेते सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला असला आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले असले तरी तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार पटकाविणाऱ्या ‘गांधी’ या चित्रपटाने त्यांची चिरंतन नाममुद्रा उमटली आहे. दोन दशकांच्या सखोल अभ्यासानंतर आणि घर गहाण टाकण्यापर्यंत मजल गाठून त्यांनी हा चित्रपट जन्माला घातला होता. १९७६ मध्ये त्यांना ‘नाइट’ किताब मिळाला होता.
अवघ्या चार दिवसांवर त्यांचा वाढदिवस येऊन ठेपला असतानाच सर अ‍ॅटनबरो यांनी जगाचा निरोप घेतला.  त्यांच्या मागे पत्नी व जुन्या जमान्यातील अभिनेत्री शीला सिम तसेच अभिनेते व दिग्दर्शक पुत्र मायकेल आणि अभिनेत्री कन्या शार्लेट आहेत. गेली काही वर्षे त्यांची प्रकृती ढासळली होती आणि ते कलावंतांचे निवृत्त जीवन आनंदात जावे यासाठी बांधलेल्या विश्रामगृहात आपल्या पत्नीसह राहात होते.
वीस वर्षे अथक अभ्यास आणि परिश्र म करून १९८२ मध्ये त्यांचा ‘गांधी’ हा चित्रपट पडद्यावर साकारला.या चित्रपटाने सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार त्यांना लाभला होता. त्याबरोबर उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक व उत्कृष्ट अभिनेता असे एकूण आठ ऑस्कर या चित्रपटाला मिळाले होते. ‘गांधी’ चित्रपटात महात्मा गांधी यांची भूमिका बेन किंग्स्ले यांनी समरसून केली होती. रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत हा चित्रपट अतिशय वेगळा ठरला होता.