रविवारी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. या आंदोलनात बॉलिवूडचे काही अभिनेतेही आंदोलनात सहभगी झाले होते. आता चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं, असा सल्ला नाना पाटेकर यांनी दिला. आम्हीही विद्यार्थी होतो, तुम्हीही विद्यार्थी आहात. आपले आई-वडिल कोणत्या परिस्थितीतून जात असताना आपल्याला शिक्षण देत असतात, हे विसरता कामा नये. जर आपल्याला कोणत्या एका पक्षानं लोटलं तर आपलं विद्यार्थी म्हणून करिअर संपून जातं. हे राजकीय पक्ष सोडायला तयार नाहीत. विद्यार्थ्यांना हे कळत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं, असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

आणखी वाचा – JNU Violence: सरकारचा भांडा फोड करायचा आहे, अनुरागचा मोदी सरकारवर निशाणा

जेएनयूच्या आवारात घुसून रविवारी रात्री उशीरा काही बुरखाधारी लोकांनी गोंधळ घातला होता. विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर त्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये १८ विद्यार्थी आणि काही प्राध्यापक जखमी झाले होते. सुमारे ५ तास हा गोंधळ सुरु होता. जेएनयूच्या विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयेषी घोष हीच्या डोक्यात मारहाण झाल्याने ती गंभीर जखमी झाली होती. अनेक जखमी विद्यार्थ्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. हा हल्ला अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचा आरोप जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केला होता. तर अभाविपनं हा आरोप फेटाळत डाव्या विद्यार्थी संघटनांवर आरोप केला होता.