अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाला म्हणजेच जय शहा यांना झालेल्या फायद्याची रितसर चौकशी व्हावी, अशा मागणी केली आहे. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘शहा यांच्या मुलावर इतके गंभीर आरोप लावलेले असताना त्यांची पाठराखण का केली जातेय? सत्य काय आहे ते जगासमोर आलेच पाहिजे’, असं ते या मुलाखतीत म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. अतिशय सूचक शब्दांमध्ये आपलं मत मांडत, सीझरच्या पत्नीच्या फर्मानाचे वर्णन करताना ते म्हणाले, ‘या प्रकरणी कोणत्याही स्तरावर आरोप लावले गेले, चौकशीची मागणी करण्यात आली तरीही तुमच्या व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असली पाहिजे.’

अमित शहा यांचा मुलगा जय शहा हा गुजरातमधील एक उद्योजक असून, त्याने ‘दी वायर’ या संकेतस्थळावर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकल्यानंतर या सर्व प्रकरणाला जास्त हवा मिळाली. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जय शहा यांच्या कंपनीच्या नफ्यात १६००० पटींनी वाढ झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी त्यांनी हा खटला दाखल केला.

सध्याच्या घडीला देशाच्या राजकीय वर्तुळात जय शहा यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळते आहे. या सर्व प्रकरणी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि पियुष गोयल यांनी शहा यांची पाठराखण केली. तर, विरोधी पक्ष काँग्रेसने या सर्व प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावे, अशी मागणी केली.

वाचा : उद्योगांसाठी जागा नावे करणाऱ्या मातब्बरांना धक्का

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीसुद्धा जय शहा यांची पाठराखण केली जात असल्याप्रकरणी नाराजीचा सूर आळवला होता. जय शहा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांच्या आधारे त्यांच्या चौकशीचे आदेश न दिल्यामुळे त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपची नैतिक मुल्ये हरवत चालली आहेत, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं.