सुपरस्टार रजनीकांत यांच्या मागोमाग दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक तगडं नाव राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज आहे. ते नाव म्हणजे अभिनेता कमल हसन यांचे. आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करु इच्छिणारे कमल हसन बुधवारी सकाळपासूनच एका महत्त्वपूर्ण प्रवासासाठी मार्गस्थ झाले. या अतिशय खास दिवसाची सुरुवात करत हसन यांनी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील मुळ घरी भेट दिली. यावेळी त्यांनी कलामांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. त्यामागोमाग ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे त्यांनी स्थानिक मासेमारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर ते माध्यांसमोर आले.

माध्यमांशी संवाद साधताना हसन यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नेहमीच आपल्यासाठी प्रेरणास्थानी राहिले असून, त्यांच्या देशभक्तीचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे ते म्हणाले. कलामांच्या देशभक्तीला सलाम करत हसन यांनी त्यांच्या घरी भेट देण्यामागे कोणताच राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी प्रेक्षकांच्या मनात स्थान करणाऱ्या हसन यांच्या एका वक्तव्याने उपस्थितांची मनं जिंकली.

‘मी आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात राहात होतो. पण, आता राजकारणाच्या माध्यमातून मला तामिळनाडूच्या जनतेच्या घराघरात पोहोचायचे आहे, जनतेत राहायचे आहे. राजकारणात सक्रिय असताना जनसेवेलाच माझे प्राधान्य असेल’, असे ते म्हणाले. महात्मा गांधी आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच आपणही साध्या राहणीला प्राधान्य देत असून, हेच साधेपण माझी ओळख असेल असं म्हणत हसन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बुधवारी संध्याकाळी मदुराई येथे ते राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस असल्यामुळेच आपण पक्षस्थापनेसाठी या दिवसाची निवड केल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.