जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात तैनात असलेल्या पोलिसांसमोरच एका युवकाने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. त्यात जामियाचा विद्यार्थी जखमी झाला. या प्रकाराचे दिल्लीसह राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असून यात बॉलिवूड कलाकारही त्यांचं मत मांडण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री सयानी गुप्ताने या प्रकरणी ट्विट करुन हेच रामराज्य का? असा सवाल उपस्थित केला आहे.

“तुम्ही याच रामराज्याविषयी म्हणत होतात? हे सारं पाहून भगवान राम यांना आनंद होईल? हिंदुत्व हे हिंदूत्ववादापेक्षा विरुद्ध आहे. पहिले हिंसाचार आणि नंतर आंदोलन करायला सांगतो. त्यानंतर एकता आणि सद्भावनेचा जल्लोष साजरा करतात, असं टिवट सयानीने केलं. तिच्या या ट्विटनंतर साऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. सयानीप्रमाणेच स्वरा भास्कर, जिशान अय्यूब, ऋचा चड्ढा यांनीही त्यांचं मत मांडली आहेत.

दरम्यान,महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामियाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजघाटपर्यंत शांतता मोर्चा काढण्याचे ठरवले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केले. ते नंतर देशभर पसरले आणि जामियापासून काही अंतरावर असलेला शाहीन बाग हा परिसर आता आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे. जामिया येथेही आंदोलन कायम असून मोर्चा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी हजारो विद्यार्थी जमले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलीसच नव्हे तर शीघ्र कृती दलाचा ताफाही तैनात असताना हिंसाचाराची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. जवळपास सात तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.