अदानी आणि अंबांनी यांसारख्या उद्योगपतींना सरकारच्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाची अगोदरपासूनच माहिती होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपच्याच एका आमदाराने केला आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयावरून टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील काल नोटाबंदीचा निर्णय सामान्य जनतेचा पैसा उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी घेण्यात आल्याचे म्हटले होते. काँग्रेस नेत्यांनीही या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरले होते. केंद्र सरकारला विरोधकांकडून अशाप्रकारच्या आरोप अपेक्षितच होते. मात्र, आता भाजपचे राजस्थानमधील आमदार भवानी सिंग यांच्या विधानामुळे पक्षाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. आमदार भवानी सिंग यांचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून आज संसदेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अदानी, अंबांनी यांच्यासह काही जणांना सरकार ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करणार असल्याचे माहित होते. त्यांना सावध करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी या निर्णयाची घोषणा होण्यापूर्वीच योग्य ती व्यवस्था केली होती, असे राजवत यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर राजवत यांनी या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. मी काही पत्रकारांशी अनौपचारिक संभाषण केले होते. त्यापैकी काहीजणांनी हे संभाषण विकृतपणे सादर केले, असा आरोप राजवत यांनी केला. व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे आपण काहीही बोललो नसल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, या व्हिडिओमध्ये राजवत यांना नव्या नोटांच्या दर्जाविषयी विचारणा करण्यात आल्याचे दिसत आहे. त्यावेळी राजवत यांनी नव्या नोटा खालच्या दर्जाच्या असून त्या बनावट वाटतात, असे म्हटले होते. तसेच सरकारने या निर्णयानंतर निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन सुरूवातीलाच नोटा छापणे गरजेचे होते. मात्र, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील बदल जाहीर केला जातो तसा हा निर्णय जाहीर केला, अशी टीकाही राजवत यांनी केली आहे.