राजस्थानातील भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून राजस्थानमधील भाजपच्याच एका आमदाराने सरकारला घरचा अहेर दिला आहे. मोठय़ा नोटांवर बंदी घालण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना अंबानी, अदानी यांच्यासारख्या बडय़ा उद्योगपतींना आधीपासूनच होती, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार भवानी सिंह यांनी केला आहे.

राजस्थानातील कोटा मतदारसंघातील भाजपचे आमदार भवानी सिंह यांनी नोटाबंदीबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने जनतेला किमान एक महिना वेळ द्यावयास हवा होता, असे भवानी सिंह यांनी म्हटले आहे.

१०० रुपयाच्या मोडीत निघालेल्या नोटा चलनात

नागपूर : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याच्या निर्णय केंद्र सरकारने अचानक घेतल्याने वाढलेली १०० रुपयांची मागणी पूर्ण करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर त्यांच्याकडे विविध बँकांकडून मोडीत काढण्यासाठी आलेल्या १०० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची वेळ आली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात चलनटंचाई निर्माण झाली. रोखीने व्यवहार करताना अडचणी यायला लागल्या. पाचशे आणि हजार रुपयांचा नोटावरील भार शंभर रुपयांच्या नोटेवर पडला आहे. त्यामुळे सर्वत्र या नोटांची मागणी वाढली. दुसरीकडे मागणीच्या प्रमाणात नवीन शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध नाहीत. आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक त्या प्रमाणात नोटा तातडीने उपलब्ध करणे शक्य नाही. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने त्यांच्याकडे मोडीत काढण्यासाठी जमा करण्यात आलेल्या नोटा बाजारात आणून तात्पुरती सोय करणे सुरू केले आहे.

मोडीत काढण्याची प्रक्रिया

बँकांकडून जुन्या, टाकावू, मळकट, फाटलेल्या, रंग लागलेल्या नोटा मोडीत काढण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे जमा केल्या जातात. रिझव्‍‌र्ह बँक त्या नोटांची छाननी करून त्यातील चांगल्या नोटा वेगळ्या करते आणि पुन्हा त्या नोटा चलनात आणते. उरलेल्या सर्व नोटा जाळून नष्ट केल्या जातात. दरम्यान, मोडीत काढण्यासाठी आलेल्या नोटा बाजारात उपलब्ध करण्यात आल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेच्या नागपूर शाखेचे जनसंपर्क अधिकारी के.के. भगत यांना विचारणा केली असता, ‘माझ्या माहितीत असे काही नाही,’ असे उत्तर दिले.