देशातील 6 मोठ्या विमानतळांची देखभाल, दुरुस्ती आणि अत्याधुनिकीकरणाचे संपूर्ण कंत्राट आता अदानी समूहाकडे असणार आहे. अदानी समूहाने देशातील 6 विमानतळांसाठी बोली लावली होती. त्यापैकी 5 बोली ते आधीच जिंकले होते, पण गुवाहाटी विमानतळाचं कंत्राट कोणाला मिळणार हे अद्याप जाहीर झालं नव्हतं. मंगळवारी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुवाहाटी विमानतळाची बोली देखील अदानी समूहानेच जिंकली, परिणामी त्याचं कंत्राट देखील अदानी समूहालाच मिळणार आहे.

लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरु आणि त्रिवेंद्रमच्या विमानतळांसाठी लावलेली बोली अदानी समूहाने यापूर्वीच जिंकली होती, मंगळवारी गुवाहाटी विमानतळासाठीची बोलीही जिंकल्याने आता अदानी समूहाकडे लवकरच या विमानतळांची जबाबदारी असणार आहे. औपचारिक व्यवहार पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडे 6 विमानतळांची जबाबदारी सोपवण्यात येईल’, असं एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या (एएआय) अधिकाऱ्यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मोदी सरकारने एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे असणाऱ्या 6 विमानतळांची जबाबदारी सार्वजनिक-खासगी भागिदारी (पीपीपी) अंतर्गत देण्याबद्दलच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. दरम्यान, सहाव्या म्हणजेच गुवाहाटी विमानतळाचं कंत्राट कोणाला मिळणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही.