सेवा, देखभालीची जबाबदारी

नवी दिल्ली : देशाच्या नागरी हवाई सेवाक्षेत्रात शिरकाव करताना अदानी समूहाला पाच विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले आहे.  स्पर्धकांच्या तुलनेत अधिक रकमेची बोली लावूनही अदानी समूहाला हे कंत्राट मिळाले आहे.

सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील सहा छोटय़ा विमानतळांच्या लिलावाची प्रक्रिया खासगी-सार्वजनिक भागीदारीद्वारे गेल्या वर्षी सरकारने सुरू केली होती. या निविदेत अदानी समूहाने बाजी मारल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले असून त्यासाठी प्रति प्रवासी अनुक्रमे १७७, १७४, १७१, १६८ आणि ११५ रुपये भाडे निश्चित केले आहे.

पुढील ५० वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असेल. अदानीच्या स्पर्धेत दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचे परिचलन करणाऱ्या जीएमआरची निविदा कमी रकमेची असूनही अदानीची निवड झाली. या पाच विमानतळाकरिता १० कंपन्यांच्या ३२ तांत्रिक निविदा आल्या होत्या. पैकी कंत्राटविजेत्या अदानीचा आता या क्षेत्रातही शिरकाव झाला आहे. समूह सध्या बंदर, जहाज, ऊर्जा तसेच अन्य पायाभूत क्षेत्रात कार्यरत आहे. सहाव्या, गुवाहाटी विमानतळासाठीची निविदा गुरुवारी खुली होणार आहे.