पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगला देशच्या दौऱ्यावर असून या वेळी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीने तेथे मोठा वीज प्रकल्प व द्रव नैसर्गिक वायू आयात टर्मिनल उभारण्यासाठी ३ अब्ज अमेरिका डॉलर्सच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे बांगलादेशातील विजेची कमतरता दूर करण्यास मदत होणार आहे.
रिलायन्स पॉवर एलएनजी टर्मिनल स्फान करणार असून त्याची क्षमता २० लाख टनांची असणार आहे तसेच वीज प्रकल्पाची क्षमता तीन हजार मेगावॉटची असणार आहे. त्याबाबतच्या समझोता करारावर रिलायन्स पॉवरचे कार्यकारी उपाध्यक्ष समीर गुप्ता यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
रिलायन्स पॉवर कंपनी बांगलादेशात तीन वर्षांत वीज प्रकल्प उभारणार असून त्यासाठी आंध्र प्रदेशातील समालकोट प्रकल्पासाठी मागवण्यात आलेल्या यंत्रणांचा वापर करणार आहे. जनरल इलेक्ट्रिकची हमी असलेली ही उपकरणे आहेत.
रिलायन्स पॉवरने आंध्र प्रदेशात २४०० मेगावॉटचा वीज प्रकल्प उभारला असून त्याला अजून वायू उपलब्ध झालेला नाही. या प्रकल्पासाठी खरेदी केलेली यंत्रणाच बांगलादेशातील वीज प्रकल्प उभारण्यास वापरली जाणार
आहे.
 कंपनीने निवेदनात म्हटले आहे, की वीज प्रकल्प ३००० मेगावॉटचा असेल व त्यात एलएनजीचा वापर केला जाईल. त्यासाठी एलएनडी टर्मिनलही उभारले जाईल. बांगलादेशात वीजटंचाई असून भारताने तेथे केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. बांगलादेशचे वीज मंडळ या प्रकल्पासाठी जागा देणार असून एलएनजी टर्मिनल महेशखाली बेटांवर उभारले जाणार आहे.
अदानी समूहाचे दोन प्रकल्प
बांगलादेशात अदानी ऊर्जा कंपनी कोळशावर आधारित दोन वीज प्रकल्प सुरू करणार असून त्यांची क्षमता १६०० मेगावॉट असणार आहे, त्यासाठी दीड अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकल्प पूर्ण होण्यास तेरा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.