ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद भरण्यात आले नव्हते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये रंजीतकुमार यांनी राजीनामा दिला होता.

कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने भारताच्या महाधिवक्तापदी मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. मागील ११ महिन्यांपासून हे पद रिकामे होते. तुषार मेहता हे गुजरातचे आहेत. भाजपाची केंद्रात सत्तेत आल्यानंतर २०१४ मध्ये मेहता यांना अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले होते. मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम ६६ अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्याबाबत एका वेबसाइटवर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जय शाह यांनी या वेबसाइटच्या पत्रकारांवर मानहानीचा खटला दाखल केला होता. मेहता यांनी केंद्र सरकारची विशेष परवानगी घेऊन जय शाह यांच्याकडून हा खटला लढवला होता.