X
X

नेहरू, गांधी कुटुंबच काँग्रेसची ब्रान्ड इक्विटी: अधीर रंजन चौधरी

अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत.

गाधी आणि नेहरू कुटुंबच काँग्रेसची ब्रान्ड इक्विटी आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त बाहेरील अन्य व्यक्ती काँग्रेस पक्ष चालवू शकत नाहीत, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलं. ज्या स्थानिक पक्षांची कोणतीही विचारधारा नाही, असे पक्ष कमकुवत झाले तरच काँग्रेसचं पुनरागमन शक्य असल्याचे ते म्हणाले.

अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी याच कमिटीवर असते. नुकतीच सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली. यावरही त्यांनी भाष्य केलं. “गाधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीसाठी काँग्रेस पक्ष चालवणं कठिण आहे. राजकारणात ब्रान्ड इक्विटीदेखील असते,” असे चौधरी यावेळी म्हणाले. “जर भाजपाकडे पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशिवाय पक्ष योग्यरित्या काम करू शकेल का?” असा सवालही त्यांनी केला. “त्याच्याप्रमाणेच काँग्रेसमध्ये गांधी कुटुंब हे ब्रान्ड इक्विटी आहे. यात काही अयोग्य नाही. त्यांच्याकडे असलेली प्रतिभा अन्य कोणत्याही व्यक्तीकडे नाही आणि हे एक कटू सत्य आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“काँग्रेससारखा विचारधारा आणि संपूर्ण देशात परसलेला पक्षच भाजपासारख्या सांप्रदायिक पक्षाचा सामना करू सको. ज्या प्रकारे स्थानिक पक्ष काम करत आहेत, त्याप्रमाणे येत्या काही दिवसात ते आपलं महत्त्व गमावतील,” असे त्यांनी नमूद केले, “काँग्रेसचं भविष्य उज्ज्वल आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारण्यास नकार दिला होता. परंतु वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कठिण परिस्थितीतही पक्षाचं नेतृत्व केलं. त्यांच्यामुळेच 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात यश मिळालं होतं,” असं चौधरी म्हणाले.

24