योगी अादित्यनाथ हे भारतीय राजकारणाला कलंक आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्यासही ते लायक नाहीत. जर त्यांच्यामध्ये जरा सुद्धा लाज असेल तर त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी घणाघाती टीका कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी केली आहे.


उत्तर प्रदेशासह देशभरात सध्या उन्नाव बलात्कार प्रकरणावरून जनमाणसांत प्रचंड रोष आहे. योगी अादित्यनाथ या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे. योगींचा इतिहास हा गुन्हेगारी स्वरुपाचा आहे. त्यांच्यासारख्या अनेक योगी आणि कथित संतांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपण आताही त्यांना योगी म्हणून संबोधायला हवे का? योंगींबरोबर कर्नाटक आणि भारतातील संतांचा भाजपा अपमान करीत आहे, असा हल्लाबोल गुंडू राव यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

गुंडू राव म्हणाले, उन्नाव प्रकरणात भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर एफआयआर दाखल झालेली नाही. या प्रकरणात सामुहिक बलात्कार झालेल्या पीडिला मारहाणही झाली आहे. पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, योगी अदित्यनाथ यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला त्यानंतर भाजपाच्या आमदाराला अटक करण्यात आली.

कोणी खरा योगी असं करतो का? असा सवाल करीत गुंडू राव म्हणाले, योगी अादित्यनाथ यांच्या नेतृत्वाखील उत्तर प्रदेशात राम राज्य नाही तर रावण राज्य चालू आहे. त्याचे नेतृत्व भोगी अादित्यनाथ करीत आहेत. राज्याच्या जनतेप्रति योगी पूर्णपणे नापास झाले आहेत.

गुंडू राव यांच्या टीकेनंतर भाजपाही आक्रमक झाली असून बी. एस. येडीयुरप्पा म्हणाले, गुंडू राव यांच्या वक्तव्यावरुन आम्ही आश्चर्यचकीत झालो आहोत. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण नाथ संप्रादायचा तसेच मुख्यमंत्रीपदाचा अपमान झाला आहे. कर्नाटकात नाथ संप्रदायाला मानणारे लाखो लोक त्यांना माफ करणार नाहीत.