राहुल गांधी यांच्या मंदिरांच्या भेटींवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांना मंदिरात कसे बसावे याचेही ज्ञान नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी नुकतीच वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिरात राहुल गांधी नमाज पठणासाठीच्या बैठकीप्रमाणे बसल्याची टीका आदित्यनाथ यांनी केली आहे. या ठिकाणी उपस्थित धर्मगुरुंनी त्यांना मंदिरात कसे बसावे याचे मार्गदर्शन केल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले. एका खासगी कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

राहुल गांधींच्या मंदिर भेटी हे ढोंग असल्याचे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. याचे कारण सांगताना ते म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात राम आणि कृष्ण हे काल्पनिक पात्र असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले होते. जर ते काल्पनिक आहेत. तर, राहुल गांधी मंदिरात काय करीत आहेत? असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्या मंदिर भेटींमुळे आपण आश्चर्यचकित आणि दु:खी झाल्याचे आदित्यनाथ म्हणाले. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची त्यांनी खिल्ली उडवली. हा प्रकार म्हणजे काँग्रेसमुक्त भारताचा मार्ग असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल गांधींची आवश्यकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.