सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्ली, महाराष्ट्र सरकारला नोटिसा

दिल्ली व मुंबईतील बलात्काराच्या घटनांमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या एका अल्पवयीन व एका तरुण आरोपीच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने दिल्ली व महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली असून या दोन कैद्यांनी दाखल केलेल्या अपिलावर उत्तर मागवले आहे.

न्या. ए. के. सिकरी व आ.बानुमथी यांचा या पीठात समावेश असून त्यांनी फाशीला स्थगिती दिली असून दिल्लीचा विनोद ऊर्फ छोटू व मुंबईचा प्रकाश निशाद यांना अपिलावर निर्णय होईपर्यंत फाशी देता येणार नाही असे सांगितले.

विनोद ऊर्फ छोटू याची फाशीची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट २०१४ रोजी उचलून धरली होती. विनोदने इतर दोघांच्या मदतीने गुरगाव येथील सायबर सिटीत काम करणाऱ्या १९ वर्षांच्या मुलीला पळवले व नंतर सामूहिक बलात्कार करून ठार केले होते.

विनोद ऊर्फ छोटू याच्या शिवाय उच्च न्यायालयाने राहुल व रवी या दोघांचीही फाशी योग्य ठरवली होती, कारण काही गुन्हेगारी चाचण्यात ते दोषी असल्याचे सिद्ध झाले त्यामुळे त्यांना फाशी द्यावे असे न्यायालयाने म्हटले होते.

विनोद याने त्याच्या शिक्षेवर अपील केले असून त्याच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ९ फेब्रुवारी २०१२ रोजी कुतुबमिनार येथे या मुलीच्या घराजवळून तिचे अपहरण करण्यात आले होते व नंतर सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना असे म्हटले होते की, हरयाणातील रेवारी जिल्ह्य़ात रोधाई खेडय़ात एका शेतात तीन दिवसांनी या मुलीचा तुकडे केलेला मृतदेह सापडला होता. आरोपींनी तिच्या डोळ्यात अ‍ॅसिड ओतले होते.

मुंबईच्या प्रकाश निशाद प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर २०१५ रोजी त्याच्या फाशीची शिक्षा वैध ठरवली होती. त्याने मुंबईत भाईंदर येथे २०१० मध्ये एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून केला होता.

११ जून २०१० रोजी ही मुलगी हरवल्याची तक्रार आली. जेवणानंतर खेळायला गेली ती परत आलीच नाही, असे कुटुंबीयांनी म्हटले होते. नंतर तिचा मृतदेह सापडला.  निशादच्या घराच्या तपासणीत टाइल्सवर रक्त व मुलीचे कपडे दिसून आले होते.