पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असलेल्या फुटीरतावादी नेत्यांना जम्मू-काश्मीर सरकारने जोरदार दणका दिला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

मीरवाइज उमर फारूक, शब्बीर शाह, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि अब्दुल गनी बट यांचा यात समावेश आहे. या फुटीरतावाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी संरक्षण दिले होते.  जम्मू काश्मीरमधील आधिकाऱ्याने सांगितले की, मीरवाइज उमर फारूक आणि अन्य चार नेत्यासह इतर फुटीरतावादी नेत्यांना यापुढे कोणतीही सुरक्षा दिली जाणार नाही.  शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत.

पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थाशी (आयएसआय) संपर्क ठेवणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेची समिक्षा केली जाईल असे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर भेटीवर गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते. केंद्र सरकारच्या सल्ल्यानंतर आयएसआयशी संपर्क करत असलेल्याच्या ज्या फुटीरतावादी नेत्यावर संशय आहे अशा नेत्यांच्या सुरक्षाची समिक्षा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एका आधिकाऱ्याने सांगितले.

 १४ फेब्रुवारी रोजी तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने पुलवामा जिल्ह्यात चढवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.