भाजपच्या एका नेत्याच्या अध्यक्षतेखालील ट्रस्टतर्फे संचालित चार शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेताना अर्जात ‘भारतमाता की जय’ लिहिणे अनिवार्य केले आहे. या संस्था अहमदाबादपासून सुमारे २५० किलोमीटरवरील अमरेली जिल्ह्य़ातील आहेत.
या घटनेमुळे सध्या राष्ट्रवादाबाबत सुरू असलेल्या वादविवादात भर पडून संघप्रणीत उजव्या विचारांच्या संघटना आणि मुस्लीम समुदाय व राजकीय विरोधक यांच्यात संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत.
श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या एम.व्ही. पटेल कन्या विद्यालय, टी.पी. मेहता व एम.टी. गांधी गर्ल्स हायस्कूल, पटेल विद्यार्थी आश्रम आणि डी.एम. पटेल भौतिकोपचार महाविद्यालय या चार संस्थांमध्ये एकूण ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात ही देशभक्तीपर घोषणा लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. देशातील शिक्षणसंस्थांच्या परिसरात सध्या राष्ट्रविरोधी घोषणाबाजीला ऊत आला आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांमध्ये तरुण वयातच राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्टचे प्रमुख व भाजप नेते दिलीप सांघानी यांनी सांगितले. स्वातंत्र्यसंग्राम सैनिक मोहन वीरजी पटेल यांनी एका शतकापूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचा वारसा पुढे नेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.विरोधी पक्ष काँग्रेसने या कृतीला जोरदार विरोध केला आहे. टी.पी. मेहता व एम.टी. गांधी गर्ल्स हायस्कूल ही शाळा २०१२ सालापर्यंत अमरेली महापालिकेतर्फे चालवली जाणारी कन्याशाळा होती. अजूनही ती सरकारी इमारतीत चालवली जाते. अशी सक्ती म्हणजे घटनेचा खून आहे, असे अमरेलीचे आमदार परेश धनानी म्हणाले.