व्याभिचारावर भाष्य करणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ४९७ ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी यासाठी दोन्ही पक्ष जबाबदार सारखेच जबाबदार असून, हे कलम पुरुष आणि महिलांमध्ये दुजाभाव करणारं असल्याचं म्हटलं आहे. विवाहित महिला जर एखाद्या विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर फक्त पुरुषच दोषी का ? यासाठी महिलादेखील तितकीच जबाबदार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत म्हटलं आहे की, जर अविवाहित पुरुष कोणत्याही विवाहित महिलेसोबत शरिरसंबंध ठेवत असेल तर तो व्यभिचार नसतो. लग्नाची पवित्रता जपणं पती आणि पत्नी दोघांचीही जबाबदारी असते असं न्यायालयाने सांगितलं आहे. विवाहित महिला एखाद्या विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर फक्त पुरुषच दोषी का ? महिलादेखील त्यात समान भागीदार असते असं न्यायालयाने म्हटलं आहे. फक्त एका पक्षाला दोषी मानण्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

जर विवाहित महिला पतीच्या सहमतीने एखाद्या विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा नाही. याचा अर्थ महिला त्या पुरुषाचा खासगी संपत्ती आहे आणि त्याच्या मर्जीने वागायचं असं आहे का ? अशी विचारणा करत न्याायलयाने आश्चर्य व्यक्त केलं.

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत व्यभिचार (Adultery) कायद्याला बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कलमानुसार, विवाहित महिलेसोबत विवाहबाह्य शरीर संबंध ठेवण्यासाठी केवळ पुरुषांना शिक्षेची तरतूद आहे. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यामध्ये न्यायमूर्ती आर एफ नरीमन, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचाही समावेश आहे.

काय आहे कलम ४९७?
एखाद्या पुरुषाने विवाहित स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले तर त्या स्त्रीचा नवरा संबंधित पुरुषावर कलम ४९७ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो. भारतीय दंडविधानाच्या कलम ४९७ नुसार या ‘गुन्ह्या’साठी पुरुषाला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. परंतु, या कायद्यानुसार असे संबंध ठेवणाऱ्या विवाहीत महिलेला मात्र या कलमाखाली गुन्हेगार मानलं जात नाही. किंवा या कलमानुसार विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या विवाहीत पुरुषाची पत्नी मात्र असा गुन्हा दाखल करू शकत नाही.