देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तिच्याही वाटय़ाला आला नसेल इतक्या मोठय़ा शाही सोहळय़ात नरेंद्र मोदी आज, सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या या शपथविधी सोहळय़ात ‘सार्क’ देशांचे प्रमुख आणि चार हजार मान्यवरांच्या उपस्थितीत मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.
आता पुरे..!
शपथविधीची सारी तयारी पूर्ण झाली असली तरी मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असेल, याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नसेल, असे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांना गृहमंत्रिपद मिळणे निश्चित असून अरुण जेटली, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांचीही महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाबाबत कमालीची गुप्तता पाळली असून राष्ट्रपतींनादेखील सोमवारी सकाळीच मंत्र्यांची यादी सादर केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांना केंद्रीय गृहमंत्रिपद दिले जाऊ शकते. नवीन व्यक्तिची निवड होईपर्यंत राजनाथ यांना काही काळासाठी पक्षाध्यक्षपदीही कायम ठेवण्यात येणार असल्याचे समजते. राजनाथ यांच्याप्रमाणेच अरुण जेटली, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांना अव्वल पाच खात्यांचे मंत्रिपद दिले जाईल. मात्र लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी मंत्रिमंडळात नसण्याची दाट शक्यता आहे. जोशी यांना लोकसभा अध्यक्षपद मिळण्याची चिन्हे असली तरी भाजपचे करिया मुंडा आणि सुमित्रा महाजन यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. घटक पक्षांतर्फे लोजपचे रामविलास पासवान, तेलुगु देसमचे अशोक गजपती राजू, शिवसेनेचे अनंत गीते, राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उपेंद्र कुशवाह यांना मंत्रिपदे मिळतील, असे समजते.
सेनेची ‘शपथ’ सुटली!
अनंत गीतेंना मंत्रिपद
 मोदी यांच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात रायगडमधून विजयी झालेले सेनेचे ज्येष्ठ खासदार अनंत गीते हे शपथ घेतील, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. रविवारी सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांना उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून गीते यांचे नाव यावेळी दिले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या आणखी काहीजणांचा समावेश होईल. मात्र शिवसेनेला नेमकी किती मंत्रिपदे दिली जाणार आहेत, ते अद्याप निश्चित झालेले नाही. 
आज दिवसभरात

* सकाळी ७ : मोदी राजघाटवर
* सकाळी ९.२५ ते दुपारी २: श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणीस्तान, मालदीव, मॉरिशसच्या राष्ट्रप्रमुखांचे आगमन
* सायंकाळी ५ :  राष्ट्रपती भवनाकडे निमंत्रितांचे कूच.
* सायंकाळी ६: नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार. अन्य मंत्र्यांचाही शपथविधी.
* रात्री ८.३०: ‘सार्क’मधील नेत्यांसोबत राष्ट्रपतींचा भोजन समारंभ