भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. नवी दिल्लीमध्ये आलेल्या भागवत यांना अडवाणी बुधवारीच भेटणार होते. मात्र, तब्येत बरी नसल्यामुळे अडवाणी यांनी भेट पुढे ढकलली होती. अखेर गुरुवारी सकाळी अडवाणी संघाच्या दिल्लीतील कार्यालयात पोचले. 
नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर अडवाणी यांनी तीन पदांचा राजीनामा दिला होता. भागवत यांनी राजीनामा मागे घेण्याचा सल्ला दिल्यानंतरच अडवाणी यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकमेकांना भेटत आहेत. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे, हे अद्याप कळलेले नाही. दरम्यान, मोदी यांनीदेखील मंगळवारी अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर विविध विषयांवर चर्चा झाली होती.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह आणि माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही बुधवारी भागवत यांची भेट घेतली होती.