नरेंद्र मोदी यांची प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर नाराजीच्या नावाखाली बंडाचे हत्यार उपसणारे आणि नंतर पुन्हा माघार घेणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची भेट घेतली. 
भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक गुरुवारी नवी दिल्लीमध्ये झाली. या बैठकीमध्ये अडवाणी सहभागी झाले होते. मोदीदेखील या बैठकीला आले होते. या बैठकीनंतर लगेचच दुसऱया दिवशी अडवाणी संघाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी नागपुरात दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
अडवाणी यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी बैठकीमध्ये चर्चा केली. नेमक्या कोणत्या विषयावर ही चर्चा झाली, हे समजू शकलेले नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते एक मागून एक संघनेत्यांची भेट घेत आहेत. मुरली मनोहर जोशी यांनी गुरुवारी नागपूरमध्ये संघनेत्यांची भेट घेतली होती. शनिवारी पक्षाध्यक्ष राजनाथसिंह हे देखील संघाच्या नेत्यांना भेटण्यासाठी नागपुरात येत आहेत.