भाजपच्या मार्गदर्शक मंडळातील सदस्य लालकृष्ण अडवाणी यांनी एका मुलाखतीत लोकशाही संपवू पाहणारे घटक प्रबळ होत असल्याची भावना व्यक्त केली होती. तसेच भविष्यात आणीबाणी येऊ शकते, असे मत व्यक्त केले होते. अडवाणी यांचे हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून होते, अशी टीका काँग्रेस तसेच आम आदमी पक्षाने केली आहे.
दिल्लीत हा पहिला प्रयोग होणार काय, असा सवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. आम्हाला रोजच अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागते, असा सूर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आळवला आहे. तर मोदींच्याच राजवटीत अडवाणी यांची अशी भावना होत आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी टीकेची संधी साधली. सध्या कुणाचे सरकार आहे ते पाहूनच अडवाणी बोलले हे उघड आहे. पंतप्रधानांचे वर्तन कसे आहे हे ठाऊक आहे. अडवाणी ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते मोदींबाबतच बोलत आहेत हे सर्वानाच माहीत आहे, अशी टीकाही वडक्कन यांनी केली.
अडवाणी योग्यच बोलले, अशी ट्विप्पणी केजरीवाल यांनी केली आहे. मोदींच्या धोरणावर ही टीका असल्याचे आपचे नेते आशुतोष यांनी केली. अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे मत गांभीर्याने घ्यायला हवे, असे नितीशकुमार यांनी सांगितले.