खासदार कीर्ती आझाद यांच्यावर भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंग कारवाईच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र जमून चर्चा केली. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा हे ज्येष्ठ या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत कीर्ती आझाद यांच्यावर पक्षाकडून करण्यात आलेली निलंबनाची कारवाई आणि पक्षनेतृत्त्वासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. आज दुपारच्या सुमारास अडवाणी, शांता कुमार आणि सिन्हा मुरली मनोहर जोशी यांच्या घरी जमले आणि त्यानंतर या बैठकीला सुरूवात झाली. या बैठकीचा नेमका तपशील सांगण्यास या नेत्यांनी नकार दिला. आम्ही भेटलो आणि चहा घेतला, अशी प्रतिक्रिया कुमार यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, पक्षातून निलंबित झालेल्या कीर्ती आझाद यांची पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात रवानगी होणार असल्याची चर्चा आहे. कीर्ती आझाद आज रात्री आठच्या सुमारास भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशींना भेटणार आहेत.

यापूर्वी बिहार निवडणुकांतील भाजपच्या दारूण पराभवानंतर १० नोव्हेंबरला या ज्येष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन पक्षनेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्रक जारी केले होते. मात्र, यावेळच्या बैठकीनंतर ज्येष्ठांकडून तशाप्रकरची कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, योग्य वेळ आणि व्यासपीठ पाहून ज्येष्ठ नेते त्यांचे म्हणणे मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर लगेचच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कीर्ती आझाद यांची भाजपतून हकालपट्टी केली होती.