प्रकृती अस्वास्थ्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या शुक्रवारी होणाऱया बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी उपस्थित राहणार नाहीत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारपासून दोन दिवस गोव्यात होणार आहे. या बैठकीला अडवानी येण्याची शक्यता आहे.
भाजपतील सर्व ज्य़ेष्ठ नेते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे विषय ठरविण्यासाठी पणजीत जमले आहेत. त्यांची बैठक शुक्रवारी होणार आहे. मात्र, ८५ वर्षांच्या अडवानी यांची तब्येत बिघडल्यामुळे ते या बैठकीला येणार नाहीत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराची धुरा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर द्यावी, यासाठी पक्षनेतृत्त्वावर मोठा दबाव आहे. त्यातच गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने निर्विवाद विजय मिळवला. लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या चार जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून आले. त्यामुळेही मोदी यांचे पक्षातील वजन आणखी वाढले. मोदी यांच्याकडे प्रचाराची धुरा द्यावी आणि पंतप्रधानपदाची उमेदवारीही त्यांना द्यावी, यासाठीही पक्षातील काही नेते आग्रही आहेत. त्या पार्श्वभूमीवर अडवानी शुक्रवारच्या बैठकीला येणार नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झालीये.