कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा कारभार केवळ संधिसाधूपणा होता, अशी बोचरी टीका पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे. पक्षाच्या या ‘कर्तृत्वा’मुळे कर्नाटकातील निकाल हे फारसे अनपेक्षित नव्हते, असा दावाही त्यांनी केला आहे.
सर्वसामान्य नागरिकाला गृहीत धरायची चूक कधीही करू नये, हाच या निकालांचा भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी धडा असल्याचे अडवाणी यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातील परिस्थितीला भारतीय जनता पक्षाने विवेकशून्यपणे हाताळल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर येडियुरप्पा यांना तातडीने पदच्युत करण्यात यावे, अशी भूमिका अडवाणी यांनी घेतली होती. पक्षाने मात्र या कामी चालढकल केली. पक्षातील जबाबदार व्यक्तींचे वर्तन संधिसाधूपणाचेच होते, असा नाराजीचा सूर अडवाणी यांनी लावला. कर्नाटकातील निकाल हे धक्कादायक नव्हते उलट तेथे भाजप विजयी झाले असते तर आपल्याला धक्का बसला असता, असेही अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर नमूद केले आहे. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामाच द्यावयास हवा, अशी मागणीही त्यांनी केली. आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांबाबत ठाम भूमिका घेऊ न शकणारे पंतप्रधान काय कामाचे असा सवालही त्यांनी केला.