सध्या देशाची अवस्था बिकट बनलेली असतानाही प्रत्येक टीव्ही वाहिनीवर आणि वर्तमानपत्रात ‘मोदी है तो मुमकीन है’ अशा जाहिराती झळकत आहेत. या जाहिराती फसव्या असून या उलट देशातील परिस्थिती बनली आहे, अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीतील रामलीली मैदानात काँग्रेसकडून सरकारविरोधात भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्या बोलत होत्या.

नवा नागरिकत्व कायदा अस्तित्वात आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, “देशात आता समानतेचा अधिकार राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था अशा वेगाने वाढत होती की चीनच्या बरोबरीने भारत वेगाने पुढे जाईल असे वाटत होते. मात्र, भाजपाच्या सहा वर्षांच्या सत्तेमुळे याला खीळ बसली आहे. रोजगार कमी झाला आहे. छोटे व्यापारी जीएसटीमुळे वैतागले आहेत, महागाई वाढत आहे. मात्र, तरीही प्रत्येक बस स्टॉपवर, टीव्हीवरील वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रात ‘मोदी है तो मुमकीन है’च्या जाहीराती झळकत आहे.”

“या जाहिरातींच्या उलट परिस्थिती देशात असून भाजपा आहे म्हणून संविधानविरोधी कायदे तयार होत आहेत. भाजपा आहे म्हणून विकास दर घटला आहे, कांदा १०० रुपये किलो झाला आहे. भाजपा आहे म्हणून ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी शक्य झाली आहे, भाजपा आहे म्हणून ४ कोटी रोजगार नष्ट होणे शक्य झाले आहे. न्याय मिळणे हा कायद्याच्या राज्यात प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, भाजपा आहे म्हणून आज देशात चारही बाजूला अन्यायाचे वातावरण आहे. गरीबांना अडचणीत आणले जात आहे तर श्रीमंतांचे लाड केले जात आहेत.” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

प्रियंका गांधी म्हणाल्या, “देशाच्या प्रत्येक नागरिकाला मी सांगू इच्छिते की, आपला आवाज उठवा, देशाचा आवाज बना. जर आज आपण आवाज उठवला नाही, गप्प बसलो तर आपल्या डोळ्यासमोर आपले क्रांतीकारक संविधान नष्ट होईल. त्यामुळे या गुन्ह्याला भाजपा जितकी जबाबदार आहे तितकेच आपणही असू. आज जर तुम्ही अन्यायाविरुद्ध लढला नाहीत तर भविष्यात तुमची भेकड म्हणून गणना होईल.”