अयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणाची सुनावणी सध्या सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर या प्रकरणी रामलल्लाचे वकील वैद्यनाथन यांनी बाजू मांडली. रामजन्मभूमीचे महत्त्व मुस्लिम पक्षकारांनाही मान्य आहे असा दावा त्यांनी केला. यासाठी एका मुस्लिम साक्षीदाराच्या साक्षीचा हवालाही वैद्यनाथन यांनी दिला. बाबरी मशीद ही मंदिर पाडून निर्मिली गेली असेल तर आम्ही त्याला मशीद म्हणणार नाही असा दावा या साक्षीदाराने केला असल्याची आठवण वैद्यनाथन यांनी करुन दिली.

एवढंच नाही तर वैद्यनाथन यांनी कोर्टासमोर १२ व्या शतकातल्या शीलालेखांचे छायाचित्रही कोर्टासमोर सादर केले. या शिलालेखात साकेत मंडळाचा राजा गोविंदचंद्र याचा उल्लेख आहे. यामध्ये संस्कृत भाषेत सांगण्यात आलं आहे की त्यांनी भव्य विष्णू मंदिर बनवले होते. पुरातत्त्व विभागानेही या शिलालेखाला दुजोरा दिला आहे. शिलालेखासोबत वादग्रस्त पडलेल्या भागातून काही प्रतीकं मिळाली आहेत. ज्यामध्ये कासव, मगर अशी काही प्रतीकं आहेत. ज्याचा मुस्लिम संस्कृतीशी काहीही संबंध नाही असंही वैद्यनाथन यांनी म्हटलं आहे.

एका पत्रकाराच्या साक्षीचा हवालाही वैद्यनाथन यांनी दिला. ASI च्या खोदकामात जे विशालकाय मंदिर सापडले होते ते मंदिर राजा गोविंदचंद्र यांनी बांधलेले विष्णू मंदिर होते अशी साक्ष या पत्रकाराने दिल्याची आठवण वैद्यनाथन यांनी करुन दिली.

सातव्या दिवशी झालेल्या सुनावणीत वैद्यनाथन यांनी नकाशे, छायाचित्रं आणि पुरातन काळातले पुरावे देत दोन हजार वर्षांपूर्वी या वादग्रस्त ठिकाणी भव्य राम मंदिर होतं असा दावा केला होता. प्राचीन मंदिराचे खांब आणि इतर साधनांचा उपयोग इमारतीच्या निर्मिती प्रक्रियेत करण्यात आला आहे. मंदिराच्या वरीर भागावर वादग्रस्त इमारत तयार केली गेली, अशा प्रकारची इमारत ही शरियतनुसार मशीद असूच शकत नाही असेही वैद्यनाथन यांनी म्हटले होते. तसेच १९५० मध्ये फैजाबादचे कोर्ट कमिश्नर यांनी तयार केलेला नकाशाही त्यांनी दाखवला. या नकाशात हे स्पष्ट दिसते आहे की वादग्रस्त भागात हिंदू पूजा करत आहेत. त्यानंतर या भागाची १९९० मध्ये घेण्यात आलेली छायाचित्रंही त्यांनी कोर्टासमोर ठेवली. आपल्या युक्तीवादात वैद्यनाथन यांनी अलहाबाद हायकोर्टात साक्षीदारांनी मांडलेले मुद्देही समोर ठेवले.