पाकिस्तानातील विविध ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी अफगाणिस्तानातून आत्मघातकी हल्लेखोरांचा एक गट पाकिस्तानात घुसल्याची माहिती मिळाल्याने पाकिस्तानने या गटाचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे, असे एका वृत्तात म्हटले आहे.
काबूलमध्ये गेल्या आठवडय़ात बॉम्बहल्ला करण्यात आला होता त्यामध्ये ६४ जण ठार झाले. या हल्ल्याप्रकरणी अफगाणिस्तानने पाकिस्तानस्थित हक्कानी नेटवर्कला दोषी ठरविले होते.
अफगाणिस्तानातून ११ आत्मघातकी हल्लेखोर २२ दिवसांपूर्वीच पाकिस्तानात घुसले असल्याचे ‘द डॉन’ने म्हटले आहे. त्यापैकी दोघांनी अलीकडेच स्वत:ला खेबर-पख्तुन्वा येथे उडविले होते. सदर आत्मघातकी हल्लेखोर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या सजना गटाशी संबंधित आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
सदर आत्मघातकी घुसखोर पाकिस्तानात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून त्यांनी ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले. सदर हल्लेखोर पंजाब प्रांत विशेषत: रावळिपडी, इस्लामाबाद आणि लाहोरवर हल्ले करू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आता पाकिस्तानातील संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णालये, बाजारपेठा, उद्याने, खाऊगल्ल्या आणि मॉल आदी ठिकाणी सुरक्षेत वाढ करावी आणि दहशतवादी हल्ल्यांना प्रतिबंध करावा, असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे. झोपडपट्टय़ा आणि ग्रामीण भागांत हे दहशतवादी दडले असण्याची शक्यता गृहीत धरून गुप्तचर यंत्रणांनी तेथे अधिक लक्ष ठेवले आहे.