भारताच्या समर्थनार्थ निदर्शने

अफगाणिस्तानातील काही गटांनी भारताच्या समर्थनार्थ निदर्शने करतानाच शेजारच्या बलुचिस्तानची सीमा ओलांडून तेथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता पाकिस्तानने सीमेवरील संबंधित ठिकाण बंद केले आहे. बलुचिस्तानातील चमन येथे फ्रेंडशिप गेट प्रवेश नाक्याजवळ मोठय़ा संख्येने लोक काल अफगाणिस्तान दिनानिमित्त जमले होते. यावेळी काही अफगाणी लोकांनी या प्रवेशद्वारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच सायंकाळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा दलांची कुमक वाढवण्यात आली तसेच या प्रवेश नाक्याचे दार अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, अफगाणिस्तानचे लोक भारताच्या समर्थनार्थ स्पिन बोल्डाक येथील सीमेवर जमले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानात लोकांवर पाकिस्तान सरकार अत्याचार करीत असल्याचा आरोप स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केला होता.

अफगाणी लोकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली व प्रवेशद्वारावर दगडफेक केली. प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने सीमवर दोन्ही बाजूंनी ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही देशातील व्यापाऱ्यांना त्यामुळे फटका बसला असून जीवनावश्यक  वस्तूंचा पुरवठा थांबला आहे. पाकिस्तानने जूनमध्ये वायव्य भागातील सीमेवर तोरखाम येथील प्रवेशनाका बंद केला होता, पण नंतर दोन्ही देशांच्या उच्च अधिकाऱ्यात चर्चा झाल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला होता.