कंदहारला जाण्यासाठी उड्डाणाच्या तयारीत असताना वैमानिकाने विमानाचे अपहरण होत असल्याची सूचना देणारे बटण चुकून दाबल्याने दिल्ली विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते, असे सूत्रांनी सांगितले.

त्यानंतर सुरक्षा दलांनी या विमानाची पूर्णपणे तपासणी केल्यानंतर दी एरियाना अफगाण एअरलाइन्सचे विमान दोन तास उशिराने रवाना झाले. या बाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया त्वरित उपलबध झाली नसली तरी विमानाचे अपहरण होत असल्याची सूचना देणारे बटण चुकीने दाबण्यात आल्याने राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) या दहशतवादविरोधी दलासह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या होत्या.

अपहरणाची सूचना देणारे बटण दाबताच एनएसजीचे कमांडो आणि अन्य यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी विमानाला वेढा घातला. त्यानंतर जवळपास दोन तासांनी पूर्ण तपासणी करण्यात आल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली, मात्र या दरम्यान विमानातील प्रवासी जीव मुठीत घेऊन होते, असे सूत्रांनी सांगितले.