अमेरिकेने पाकिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात तालिबानी नेता मुल्ला अख्तर मन्सूर हा मारला गेल्यानंतर आता नव्या नेत्याची निवड बुधवारी जाहीर करण्यात आली असून त्याचे नाव मुल्ला हैबतुल्ला अखुंडजादा असे आहे. मन्सूरचे जे दोन उपप्रमुख होते त्यांच्यापैकी तो एक आहे. त्यामुळे सिराजउद्दीन हक्कानी याचा तालिबानच्या प्रमुखपदासाठी पत्ता कापला गेला आहे. हैबतुल्ला अखुंडजादा याची निवड इस्लामिक अमिरात म्हणजे तालिबानचा नवा नेता म्हणून करण्यात येत आहे असे सांगण्यात आले.
शुराच्या बैठकीत (सर्वोच्च मंडळ) त्याची निवड करण्यात आली असून सर्व सदस्यांनी त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे मान्य केले आहे. मन्सूर हा शनिवारी पाकिस्तानात अमेरिकी ड्रोन विमानांनी केलेल्या हल्ल्यात मारला गेला होता त्यानंतर आता अखुंडजादा याची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानने अफगाण सीमेनजीक अनेक तालिबानी नेत्यांना आश्रय दिला असून २००१ पासून अफगाणिस्तानातील सरकार उलथून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.