अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सकाळी रस्त्याच्याकडेला शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. पण सुदैवाने ते थोडक्यात बचावले. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्याने दिली.

“आज पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या शत्रूंनी सालेह यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वाईट हेतूमध्ये त्यांना यश मिळाले नाही. सालेह या हल्ल्यातून बचावले” असे अमरुल्लाह सालेह यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. बॉम्बस्फोटात सालेह यांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. त्यांचे काही बॉडीगार्ड या स्फोटात जखमी झाले आहेत अशी माहिती रझवान मुराद यांनी दिली. ते सालेह यांचे प्रवक्ते आहेत.

दोन जणांचा या स्फोटात मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. सालेह आपल्या घरातून कार्यालयाच्या दिशेने जात असताना हा बॉम्ब हल्ला करण्याता आला. स्फोट इतका शक्तीशाली होता की, गाडीचे तुकडे झाले. शेजाऱ्याच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे.